माझी जिद्द, माझा व्यवसाय
शून्यातून विश्व निर्माण करणे हा वाक्प्रचार तुम्ही ऐकला आहे का?
सुरवंटाचे फुलपाखरु झालेले तुम्ही पाहिले आहे का?
या दोनही गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात घडतात, आणि आपल्यातील आतली ᳚मी ᳚ सापडते ना, तेव्हाचा आनंद ही तसाच असतो.
26 वर्षे एखाद्या ठिकाणी असलेली सुरक्षित नोकरी सोडून माझ्यातली ᳚मी ᳚ शोधायला मी बाहेर पडले.
सर्व भारतीय आणि परदेशी अनुवादाची सेवा लोकांना आणि कॉर्पोरेट क्लाएंटस देण्याचे आव्हान स्वतःला दिले आणि ते साकारण्यासाठी अथक परिश्रम केले. होनयाकू रेमिडीज या कंपनीची 2007 मध्ये स्थापना केली.
स्वतःचे साम्राज्य उभे करण्याची आतील सुप्त इच्छा साकार करण्यासाठी रात्रंदिवस झटत राहिले, नवीन व्यवसायातील नवनवीन गोष्टी शिकून घेऊन आत्मसात केल्या आणि त्याची सम्राज्ञी झाले.
अनुवाद करणे हे मुळातच थोडे बौद्धिक, आणि काहीसे क्लिष्ट काम. कित्येक लोकांना हे थोडेसे विचित्र वाटले की, अनुवाद करणे हा व्यवसाय कसा? परंतु जागतिकीकरणाच्या लाटेने सर्वांना त्याची गरज आणि महत्व पटले.
14 वर्षांचा कालावधी कसा गेला समजलाही नाही, व्यवसायातील चढ उतारानांही हिमतीने तोंड दिले आणि स्वतःमधली स्ट्रेंथ, पोटेंशिअल, सामर्थ्य समजले आणि मी अनुवादिनी बनले.
एक गोष्ट मनात पक्की झाली, जर तुमचा निर्धार असेल तर विश्वातील सर्व शक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी सज्ज असतात.
आज 2500 पेक्षा जास्त क्लाएंटसना आम्ही translation, interpretation, transcription, voice over, subtitling या सेवा देत आहोत.
मागे वळून पाहताना स्वतःला सिद्ध करण्याचा, स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी केलेला संघर्ष आठवतो, आणि स्वतःचा अभिमान वाटतो.
आयुष्याच्या संध्याकाळी सुद्धा तीच हिंमत आहे, बरेच काही साध्य करायचे आहे, अनंत माझी ध्येयाशक्ती घेऊन अनंत आशा आहेत, त्या पूर्ण करायच्या आहेत, आणि रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या ᳚ वूड्स᳚ कवितेत सांगितल्या प्रमाणे
The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.
प्रवास फार लांबचा आहे. ….